लातूर : जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीला वेग मिळत असल्याचे चित्र आहे. मजुरांची ऊस तोडणीसाठी नकारघंटा, साखर कारखान्यासोबत करार करून मजुरांनी पलायन करण्याचे प्रकार, मुकादमांचे आर्थिक नुकसान या साऱ्याचा गळितावर परिणाम होते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी साखर कारखान्यांचा हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी करून गाळप करण्याकडे कल वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कमी वेळेत तोडणीची कामे करण्याच्या दृष्टीने आता साखर कारखान्यांकडून हार्वेस्टरला प्राधान्य दिले जात आहेत.
जिल्ह्यात अकरा साखर कारखाने आहेत. शिवाय निलंगा तालुक्यात जय हनुमान खांडसरी तर नळेगाव येथे शुगर केन मास्टर गूळपावडर व मुरूड येथे ‘डीडीएनएफएसए’ हे गूळपावडर कारखाने आहेत. यापैकी जयजवान जयकिसान (नळेगाव) व ‘पनगेश्वर शुगर मिल्स’ (पानगाव) हे दोन साखर कारखाने बंद आहेत. अलीकडील काही वर्षात ठेकेदाराने पलायन करणे, ऊसतोड मजुरांनी कामे अर्धवट सोडून निघून जाणे असे प्रकार वाढले, शिवाय ऊसतोड कामगारांची कमतरताही जाणवत आहे. यामुळे सर्वच साखर कारखान्यांचा कल हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्याकडे वळला आहे.