लातूर : येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी पाचव्यांदा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची, तर व्हाइस चेअरमनपदी अशोकराव काळे (चिखुर्डा) यांची बिनविरोध निवड झाली. मांजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड झाली होती. सोमवारी चेअरमन, व्हाइस चेअरमन निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर बदनाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी चेअरमनपदासाठी दिलीपराव देशमुख व व्हाइस चेअरमनपदासाठी अशोकराव काळे यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी माजी आमदार तथा विलास कारखान्याचे व्हाइस चेअरमन वैजनाथ शिंदे, साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाइस चेअरमन प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हा. चेअरमन सचिन पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, ट्वेटी-वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, विलास बँकेचे उपाध्यक्ष ॲड. समद पटेल, काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, श्रीशैल उटगे, कार्यकारी संचालक पंडित देसाई आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते.
इतर कारखान्यांपेक्षा अधिक भाव देणारमागच्या हंगामात जो दर दिला, त्यापेक्षा अधिक दर मांजरा परिवारातील साखर कारखाने पुढील हंगामात अधिक भाव देऊ, असे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी यावेळी सांगितले. मांजरा परिवारातील साखर कारखाने अतिशय सूक्ष्म नियोजन, पारदर्शकता ठेवून कार्य करतात. यातून जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला जातो. मराठवाडा व विदर्भात मांजरा साखर परिवार अधिक भाव देऊन उसाचे गाळप करण्यात अव्वल स्थानावर असल्याचेही त्यांनी सांगितले.