लातूर : मांजरा हा विश्वासार्हतेचा ब्रँड तयार झाला आहे. ही विश्वासार्हता कधीही कमी होऊ दिली जाणार नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने, बँकांसह इतर संस्थांनी शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचा उद्देश साध्य केला आहे, असे मत माजी मंत्री, दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला. येथे विलास सहकारी साखर कारखान्याच्या २२ व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख होत्या.
यावेळी दिलीपराव देशमुख यांचा डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट संस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल तर लातूर जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. हंगामात चांगली कामगिरी केलेल्या वाहतूक, तोडणी ठेकेदार, हार्वेस्टर ठेकेदारांचाही सत्कार झाला.यावेळी आ. अमित देशमुख यांनी ऊस शेतीला मोठे भवितव्य असून ऊसउत्पादन वाढवण्यासाठी मराठवाड्यात मोठा वाव असल्याचे सांगितले. तर आमदार धीरज देशमुख यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडी २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी खा. डॉ शिवाजी काळगे, खा. ओमप्रकाश निंबाळकर, दीपशिखा देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, युनिट २ चे कार्यकारी संचालक ए. आर. पवार, सभापती जगदीश बावणे, श्रीशैल उटगे, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, समद पटेल, श्रीपतराव काकडे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी विषय पत्रिका वाचन केले. व्हा. चेअरमन रवींद्र काळे यांनी अहवाल वाचन केले. संचालक रणजित पाटील यांनी अनुमोदन दिले. राहुल इंगळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अमर मोरे यांनी आभार मानले.