लातूर : ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे साखर कारखान्यांकडून हार्वेस्टरला प्राधान्य दिले जात आहेत. हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यात अकरा साखर कारखाने आहेत. तर निलंगा तालुक्यात जय हनुमान खांडसरी तर नळेगाव येथे शुगर केन मास्टर गूळपावडर व मुरूड येथे ‘डीडीएनएफएसए’ हे गूळपावडर कारखाने आहेत. यापैकी जय जवान जय किसान (नळेगाव) व पनगेश्वर शुगर मिल्स (पानगाव) हे दोन साखर कारखाने बंद आहेत.
साखर कारखान्याकडून गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊस तोडणी ठेकेदार व वाहतूक ठेकेदार यांच्याशी करार केले जातात. आगाऊ रक्कम संबंधित करार केलेल्या ठेकेदारांना देण्यात येते. त्यानंतर गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदार मजुरांना घेऊन कारखान्यावर येतात, तेथून त्यांना तोड दिलेल्या ठिकाणी जावे लागते. अलीकडील काही वर्षात ठेकेदाराने पलायन करणे, ऊसतोड मजुरांनी कामे अर्धवट सोडून निघून जाणे असे प्रकार वाढले, शिवाय ऊसतोड कामगारांची कमतरताही जाणवत आहे. या साऱ्यांचा कारखान्याच्या गाळपावर विपरीत परिणाम होत आहे. कारखान्याचे आर्थिक नुकसानही होत आहे. तसेच ठेकेदारांना दिलेल्या आगाऊ रकमेची वसुली करण्यात अडचणी येते. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांचा कल हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्याकडे वळला आहे.
जिल्ह्यात रेणा सहकारी साखर कारखाना, मांजरा सहकारी साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना, ट्वेंटीवन शुगर कारखाना, सिद्धी शुगर, तोंडारचा विलास सहकारी साखर कारखाना युनिट दोन, तळेगावचा जागृती शुगर, अंबुलगाचा ओंकार शुगरने चालविण्यास घेतलेला शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना, गोद्रीचा साईबाबा शुगर, किल्लारीचा किल्लारी सहकारी साखर कारखाना, बेलकुंडचा संत शिरोमणी मास्ती महाराज सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. तर नळेगाव व मुरूड येथे गूळ पावडर कारखाने आहेत.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.