लातूर: तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज यांच्या वतीने चालू हंगामात गाळपास आलेल्या उसाचे उत्पादक शेतकऱ्यांना प्रती टन २ हजार ७०० रुपयाप्रमाणे खात्यावर सोमवारी (ता. ९) बिल जमा करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी दिली.
‘जागृती शुगर’ने पहिल्या गाळप हंगामापासून कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचे काम करण्यात आले. आतापर्यंत सर्व १३ गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडले असून २०२४-२५ चालू गाळप हंगामात कारखान्याने आजतागायत २१ दिवसांत १ लाख २ हजार ११० टन उसाचे गाळप केले असून त्यातून ९३ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
चालू गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी (ता. नऊ) ऊस बिल जमा होणार असून कारखान्याकडून जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न राहणार आहे. चालू गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून प्रशासनाने गाळप करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. ऊस तोड वेळेवर होईल यासाठी आवश्यक पावले कारखाना प्रशासनाकडून उचलण्यात आली आहेत. आपला ऊस आपल्या जागृती साखर कारखान्यास द्यावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.