रेणापूर : येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.२७) कारखानास्थळी होणार आहे. यावेळी डिस्टलरी (आसवणी) प्रकल्प, सोलार प्रकल्पाचे उद्घाटन व प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. देशमुख यांना ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया’ यांच्याकडून साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व सुवर्णा दिलीपराव देशमुख यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
या सर्वसाधारण सभेत गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे सभासद, ऊस तोडणी व वाहतूक करणारे ठेकेदार, हार्वेस्टरद्वारे तोडणी व वाहतूक करणारे ठेकेदार यांचा गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्त सभासदांसाठी सहकार प्रशिक्षण होणार आहे. अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेसाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खा. डॉ. शिवाजी काळगे, माजी मंत्री अमित देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. धीरज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.