लातूर : निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ संपला आहे. या हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन दोन हजार सातशे रुपयांप्रमाणे पहिला हप्ता देण्यात आला आहे. गळीत हंगाम संपताच एफआरपीपोटी दुसरा हप्ता शंभर रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. विलास साखर कारखान्याने या गळीत हंगामात ९२ दिवसांत ३ लाख ८३ हजार २११ टन उसाचे गाळप करून चार लाख ३८ हजार ७८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हंगामात सरासरी साखर उतारा ११.७५ मिळाला आहे.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख आणि अध्यक्ष वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार, गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसदर देण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला ऊसदरापोटी प्रतिटन दोन हजार ७०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला आहे. दुसरा हप्ता १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊसपुरवठा केला आहे, त्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. उर्वरित ऊसबिलाची रक्कम लवकरच अदा करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.