लातूर : निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट एक या कारखान्यामार्फत चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये उसास पहिला हप्ता आणि किमान अंतिम ऊसदर देण्याबाबतचे धोरण मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले आहे. या धोरणाप्रमाणे विलास सहकारी साखर कारखान्याकडून पहिला हप्ता प्रति टन दोन हजार सातशे रुपये अदा करण्यात आला असून अंतिम ऊस दर किमान रुपये तीन हजार रुपये प्रती टन जाहीर करण्यात आला आहे.
कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. गळीत हंगाम सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या गळीत हंगामात ३१ डिसेंबर अखेर एक लाख ७१ हजार ८४० टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. दैनिक साखर उतारा १२.३६ टक्के व सरासरी साखर उतारा ११.२५ टक्के असून एक लाख ७६ हजार ५१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. चालू गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील उसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे. या वर्षी उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. हा सर्व ऊस गाळप करण्याचे नियोजन कारखान्याने केले आहे. तरी तरी कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांनी विलास युनिट-एक कारखान्यास ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.