सांगली : राज्यासह जिल्ह्यात ऊसतोड मुकादम, मजुरांकडून ऊस वाहतूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादम, मजुरांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूकदार संघटनेने पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेचे पृथ्वीराज पवार, संदीप राजोबा, नारगोंडा पाटील, दीपक चौगुले, संदीप मगदूम, विठ्ठल पाटील, श्रीकृष्ण पाटील आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. तेली यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांकडे बीड, सोलापूरसह राज्यातील विविध भागातील ऊस तोडणी मुकादम आणि मजुरांनी वाहतूकदारांशी करार करूनही ते आले नाहीत. त्यांनी ऊस वाहतूकदारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातला आहे. अशा मुकादम आणि मजुरांवर कारवाई झाली पाहिजे. यावर जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी गुन्हे दाखल झाल्यानंतर वस्तुस्थिती लक्षात घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.