माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार : खासदार राजू शेट्टींसाठी सकारात्मक
कोल्हापूर, ता. 26 : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकसंघपणे लढणार. या आघाडीत इतर घटक पक्ष व शेतकरी संघटनांचाही सहभाग राहणार आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादीकडेच राहतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचीही आघाडीत येण्याबाबत चर्चा सुरु आहे. ते आले तर इकडे तिकडे सरकण्यासाठी वाव असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खासदार राजू शेटटी यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कोल्हापूरच्या राजकारणाबाबत मत व्यक्त केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टी यांना उमेदवारीबाबत श्री पवार म्हणाले, कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी करण्यासाठी प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. लोकसभेचा जागा वाटप करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. सध्या सात ते आठ जागांचा विषय आहे. तो ही चर्चेने सुटेल, यात शंका नाही. हातकणंगले, कोल्हापुरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आघाडी करण्याची चर्चा दोन्ही कॉंग्रेसमध्ये झाली आहे. स्वाभिमानी स्वत:हून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीत येत असेल तर त्यांच्याबाबत विचार होईल. त्यांच्यासाठी जरा इकडे-तिकडे होण्यास खासदार पवार यांनी अनुकुलता दर्शवत खासदार शेटटींच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला आहे.