शामली : शामली जिल्हा राज्यात ऊस उत्पादनामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. येथील शेतकऱ्यांनी प्रती हेक्टर १०२५.१२ क्विंटल उत्पादन घेत राज्यातील इतर ७४ जिल्ह्यांना मागे टाकले आहे. मात्र, ऊस बिले देण्यात येथील कारखाने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप पिछाडीवर आहेत. शामली, थानाभवन आणि ऊन या तीन कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे जवळपास ७२४.४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. आतापर्यंत फक्त ३६ टक्के ऊस बिले देण्यात आली आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शामली जिल्हा ऊस उत्पादनात आणि ऊस गाळपात २०१८ पासून आघाडीवर आहे. वर्ष २०१८ मध्ये येथे प्रती हेक्टर ९६२.१२ क्विंटल उत्पादन झाले होते. ते आता १०२५.१२ क्विंटलवर पोहोचले आहे. ऊस उत्पादनात मुजफ्फरनगर ९४८.८४ क्विंटल प्रती हेक्टर करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ९१४.९६ क्विंटल उत्पादन घेऊन मेरठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा तिन्ही कारखान्यांनी ३२५.१० कोटी क्विंटल ऊस गाळप केले आहे. मात्र, ऊस बिले देण्यातील स्थिती अतिशय खराब आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, यंदा फक्त ३६ टक्के ऊस बिले दिली आहेत. कारखान्यांनी ११२७.३७ कोटी रुपयांची बिले देणे अपेक्षित होते. आतापर्यंत फक्त ४०५.९० कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. एकूण ७२१.४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. लवकरात लवकर पैसे दिले जावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.