हाजीपूर : वैशाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ पटेल यांनी बंद पडलेल्या गोरौला साखर कारखान्याचा प्रश्न विधानसभेत मांडला. आपल्या सत्तारुढ सरकारच्या मंत्र्यांनाच त्यांनी याबाबत विचारणा केली.
वैशाली जिल्ह्यातील द शीतलपूर गोरौल साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली आहे का ? जर ही स्थिती दयनीय झाली असेल तर सरकारने कारखाना सुरू करण्यासाठी कोणती पावले उचलली ? येथे इथेनॉल उत्पादनासाठीची यंत्रसामुग्री लावण्याबाबत काही विचार आहे का ? अशी विचारणा त्यांनी केली.
केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा आधार घेत सरकार स्वतः लोकहितासाठी इथेनॉल उत्पादनासाठीची प्रक्रिया करू शकते असे आमदारांनी सरकारला सुनावले. जर त्यातून फायदा मिळत असेल तर सरकार इथेनॉलसाठीची यंत्रसामुग्री बसवली पाहिजे. जर ती बसवली जाणार असेल तर केव्हा ? असा सवाल आमदार पटेल यांनी केला.
या प्रश्नाबाबत ऊस व उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी उत्तर दिले. १९९४-९५ मध्ये आजारी पडलेला बिहार राज्य साखर महामंडळाचा गोरौल कारखाना बंद असल्याची कबुली त्यांनी दिली.
बिहार राज्य साखर महामंडळाकडील बंद युनीटमध्ये उसावर आधारित उद्योग तसेच अन्य पूरक उद्योगांच्या स्थापनेसाठी खासगी गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्यात आले. आर्थिक सल्लागार असलेल्या एस. बी. आय. कॅप्सच्या माध्यमातून पाच निविदा आल्या होत्या. मात्र, ऊसावर आधारित उद्योगासाठी एकही चांगला गुंतवणूकदार मिळाला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत बिहार राज्य साखर महामंडळाकडील गोरौलसह अन्य युनीट जमिनीसह सुसज्ज असूनही बंद आहेत.