नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आता कमी होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूचे नवे २ लाखापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, मृत्यूसंख्या तीन हजारावर आहे. गेले ४० दिवस दररोज दोन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळत होते. तर ४ लाख ही सर्वोच्च रुग्णसंख्या होती.
देशात गेल्या २४ तासात कोरोना विषाणूचे नवे १ लाख ९५ हजार ४८५ रुग्ण आढळले आहेत. केंद्र सरकारच्या covid19india.org या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३ हजार ४९६ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी १४ एप्रिल रोजी पहिल्यांदा भारतात कोरोना व्हायरसचे २ लाखांहून अधिक रुग्ण आढळले होते. तर १३ एप्रिल रोजी १ लाख ८५ हजार २९५ नवे रुग्ण नोंदविले गेले होते.
सद्यस्थितीत देशात २५ लाख ८१ हजार ७४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात ३ लाख २६ हजार ६७१ जण बरे झाले आहेत. यासोबतच देशातील एकूण संक्रमितांची संख्या २ कोटी ६९ लाख ४७ हजार झाली आहे तर कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाख ७ हजार २४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
आजअखेर २ कोटी ४० लाख ७६० जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.