भागलपूर : बिहारमध्ये टॅलंटचे कमी नाही. त्यामुळे बिहार मागे राहणार नाही. इथे उद्योगासाठी अमाप संधी आहे. कृषी उत्पादनांवर आधारित प्रोसेसिंग युनीट सुरू केले जाणार आहे. राज्यात बिहारमध्ये मक्का आणि ऊसापासून इथेनॉल उत्पादन केले जाईल. त्यातून शेतकऱ्यांचे नशिब बदलेल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बिहारचे उद्योग मंत्री सैयद शाहनवाज हुसैन यांनी सांगितले.
उद्योग मंत्री हुसैन येथील आनंदराम ढांढनिया सरस्वती विद्यामंदिरात आयोजित नागरिकांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. मंत्री हुसैन म्हणाले, आम्ही उद्योग क्षेत्राला चांगले पाठबळ देऊ. त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बिहारमध्ये सर्वकाही आहे. विक्रमशीला आणि नालंदा ही येथील विकासाची निशाणी आहे. पूर्वी बिहारमध्ये अपहरणाचे उद्योग सुरू असत. मात्र, मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रांमध्ये विकास झाला आहे. सर्वांच्या सहयोगाने काम केले जाते. भागलपूर सिल्क सिटीचे पुर्नवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. ज्या पद्धतीने जयपूरला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते, तशाच पद्धतीने भागलपूर सिल्क सिटीसाठी प्रयत्न केले जातील. याला जगातील सिल्कच्या नकाशावर पोहोचवू. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
भागलपूरमध्ये उद्योगांचे हब तयार केले जाईल. येथे मक्का, केळी, दूध, आंबे, टोमॅटो आदी पिकांचे अमाप उत्पादन होते. हे उद्यादन देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न करू. माझे भागलपूरशी अतूट नाते आहे असे मंत्री हुसैन यांनी सांगितले.
कार्यक्रमात पीरपैंतीचे आमदार ललन कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष अनंत कुमार उर्फ टुनटून साह, भाजपचे जिल्हाध्यक्ष रोहित पांडे यांची भाषणे झाली. जिल्हा महामंत्री अभिनव कुमार यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा उपाध्यक्ष विजय कुशवाहा यांनी आभार मानले. नाथनगरचे माजी आमदार लक्ष्मीकांत मंडळ, महापौर सीमा साहा, माजी जिल्हाध्यक्ष नरेश चंद्र मिश्रा, अभय चौधरी, अभय बर्मन, श्वेता सिंह, रोशन सिंह, प्रिती सिंह, पंकज सिंह, शशी मोदी, चंदन पांडे, प्रा. आशा ओझा, प्रशांत विक्रम आदी उपस्थित होते.