नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णसंख्ये झपाट्याने झालेली वाढ आणि राज्य सरकारांनी देशभरात लागू केलेला लॉकडाऊन अथवा कर्फ्यूसारखे निर्बंध यामुळे साखरेच्या विक्रीवर परिणाम झाली आहे. साखर कारखानदारांना आर्थिक तरलतेची गंभीर समस्या भेडसावत आहे. याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्ण पैसे देणे अडचणीचे ठरत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सद्यस्थितीत २३,००० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे.
यासंदर्भात ‘चीनीमंडी’सोबत बोलताना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, साखर कारखान्यांतील साखर विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे आर्थिक तरलतेची गंभीर समस्या आहे. उसाची बिले अदा करण्यास कारखानदार असमर्थ ठरत आहेत. या सर्व मुद्यांचा विचार केला गेला पाहिजे. पु्न्हा मार्च २०२० सारखी स्थिती निर्माण होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
नाईकनवरे म्हणाले, गेल्यावर्षी १०० दिवस लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात १ मिलियन टन साखरेचा खप कमी झाला. घाऊक खप असलेले उद्योग, उदाहरणार्थ शित पेये, आईस्क्रीम, चॉकलेट उत्पादने, बिस्किट, स्वीटमार्ट्स, सरबत आदी उद्योगांकडून त्यांच्या साखरेच्या खरेदीत कपात केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आल्याने साखरेच्या विक्रीत घट येण्याची शक्यता आहे. या महामारीचा परिणाम म्हणून भारतीय साखर उद्योग एका मोठ्या, घातक अशा व्यापार तुटीच्या दिशेने जात आहे. त्यातून आर्थिक तणाव वाढेल आणि उसाची थकबाकी वाढू शकते, अशी भीती नाईकनवरे यांनी व्यक्त केली.