पुणे : दोंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर स्थलांतरित ऊस तोडणी मजुरांसाठी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत अध्यापन वर्ग सुरू केले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालय (नवी दिल्ली) यांच्या निर्देशानुसार केंद्र पुरस्कृत उल्हास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. साक्षरता कार्यक्रमाला हातभार लावण्याचे काम श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना करीत आहे. सध्या कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यासाठी कारखाना परिसरात विविध भागांतून ऊस तोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर करीत असतात. या मजुरांमध्ये लहान मुलेही असतात. त्यांच्या शिक्षणासाठी कारखान्यावर साखर शाळा चालविली जाते. त्या माध्यमातून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
गरीब परिस्थिती व कामानिमित्त करावे लागणारे स्थलांतरामुळे ऊसतोड मजुरांना शिक्षण घेता आले नाही. अशा असाक्षर मजुरांना साक्षरतेसाठी कारखाना स्थळावर मजूर अड्ड्यामध्ये रात्रीचे अध्यापन वर्ग सुरू केले आहेत. कारखान्याकडून आवश्यक शैक्षणिक साहित्य पाटी, पेन्सिल, पुस्तके, आर्दीचे मोफत वाटप केले आहे. मजूर वास्तव्य करीत आहेत, त्याच परिसरात वीज पुरवठा करून व त्यांच्या कामाच्या वेळे व्यतिरिक्त अध्यापन वर्ग सुरू आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ते आवर्जून उपस्थित राहून धडे गिरवित आहेत. केवळ अंक ओळख व अक्षर ओळख एव्हढेच न शिकविता त्यांना व्यवहार ज्ञान देण्याचे काम या वेळी केले जात आहे. यासाठी कारखान्यामार्फत स्वयंसेविका म्हणून मीरा मोरे यांची नेमणूक केली आहे.
श्रीनाथ म्हस्कोवा साखर कारखान्याने केंद्र सरकारचे १०० टक्के साक्षरता धोरण राबविण्यासाठी स्थलांतरित असाक्षर ऊसतोड कामगारांचे अध्यापन वर्ग सुरू केलेले आहेत. कामगार व शेतकरी हिताचे विविध उपक्रम कारखाना सतत राबवित असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून अध्यापन वर्गाची सुरुवात करण्यात आली. यावेळी एस. बी. टिळेकर (केन मॅनेजर), ए. बी. शेंडगे (शेतकी अधिकारी), आर. बी. मापारे (लेबर ऑफिसर), डी. एस. रोडे (ऊस विकास अधिकारी), शेतकी विभागातील कर्मचारी, सुरक्षा गार्ड उपस्थित असतात.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.