गडहिंग्लज साखर कारखान्याला गुजरातमधील ट्रस्टकडून ३०० कोटींचे कर्ज मंजूर

कोल्हापूर : गुजरातमधील एका ट्रस्टकडून आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला तब्बल ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी ही माहिती दिली. गेल्या दोन हंगामात गोडसाखरला अनेक अडचणी आल्या होत्या. सत्ताबदलापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना हंगाम सुरू करताना फार मोठ्या आर्थिक कसरती कराव्या लागल्या. ब्रिक्स कंपनीने कारखाना सोडल्याने व वित्तीय अडचणी होत्या. ठिकठिकाणहून पैसे गोळा करून हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हंगाम म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. त्यापाठोपाठ निवडणुकीनंतरही कारखान्याचे विस्तारीकरण व मशिनरी दुरुस्तीसाठी एक हंगाम बंदच ठेवण्यात आला. आता नव्याने कारखाना हंगामासाठी सज्ज होत आहे.

गेल्या तीन वर्षांत हंगाम फारच उशिरा सुरू झाल्यानेही उत्पादकांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. सध्या गोडसाखरला केडीसी बँकेकडून अर्थ सहाय्य मिळाले असले तरी त्यावरूनही संचालकांमध्ये फारच मोठी बिघाडी आहे. संचालकांनी चेअरमनांवर मनमानी कारभाराचा आरोप करत थेट चौकशीची मागणी केली आहे. असे असताना चेअरमन डॉ. शहापूरकर यांनी थेट ३०० कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगून जुलैच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे कारखान्याकडे वर्ग होतील. यंदाचा हंगाम सुपरफास्ट होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत नेमकी परिस्थिती समजणार असून आता उत्पादकांसह कामगारांचेही याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, कारखाना एवढा बोजा कसा सोसणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here