मुंबई : महाराष्ट्रात कोविड १९च्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. लाॅकडाऊन लागू करायचा की नाही याचा निर्णय आठ दिवसांत घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
जनतेशी ऑनलाईन संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी, तुम्हाला लॉकडाउन हवा आहे का? अशी विचारणा केली. राज्यात लाॅकडाउन लागू होणार की नाही हे आठ दिवसांतील स्थितीवर अवलंबून आहे असे ते म्हणाले. जर कोरोना रुग्ण वाढले तर आपल्याला लॉकडाउन करावे लागेल. ज्यांना लॉकडाउन हवा आहे ते विनमास्क फिरू शकतात. पण ज्यांना लॉकडाउन नको आहे ते नियमांचे पालन करतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानानंतर मी जबाबदार हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी जबाबदार या मोहिमेत लोकांना स्वत: काळजी घ्यावी लागेल. सामाजिक स्वास्थ्य लक्षात घेऊन वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित वावर या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात लागू केलेल्या कडक उपाययोजनांचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले, आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. अमरावती जिल्ह्यात एक आठवडा पूर्णपणे सर्व बंद राहील. महाराष्ट्रात गर्दी होणारे कार्यक्रम, राजकीय आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.