बेंगलुरु: कर्नाटकमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारने लॉकडाऊनमध्ये ७ जूनपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी ही मुदत २४ मेपर्यंत होती. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. या कालावधीत फक्त अत्यावश्यक कामांना सूट दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्ण लॉकडाऊन दरम्यान राज्यात रेस्टॉरंट, मांस, भाजीपाला यांची दुकाने सकाळी ६ ते दहा या कालावधीत सुरू राहणार आहे. कर्नाटकमध्ये ७ एप्रिलपासून निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, कोरोना संक्रमण वाढल्याने आणि मृतांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने १० मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत.
येडीयुरप्पा यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणखी लॉकडाऊनची गरज आहे. त्यामुळे यापूर्वी आम्ही १० ते २४ मे या कालावधीत लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यात वाढ करून सात जूनपर्यंत मुदत निश्चित करण्यात आली आहे. जनतेने निर्देशांचे पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सकाळी दहानंतर घराबाहेर पडल्यास कारवाई
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितले की, राज्यात कोरोना संक्रमणामुळे वाढती मृत्यूसंख्या पाहता पूर्ण लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यांदरम्यान, सकाळी दहा वाजल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्याची अनुमती नसेल. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन नागरिकांनी करावे. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.