नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूश करण्यात राजकीय पक्ष कोणतीही कसर सोडत नाहीत. ऊस दर आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. पण योगी सरकारही आपली कामगिरी शेतकऱ्यांसमोर मांडत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी कोणत्याही साखर कारखान्याने शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पेमेंट न केल्यास त्याचा लिलाव केला जाईल, असा इशारा दिला. मुख्यमंत्री योगी यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) बिजनौर मतदारसंघातील उमेदवार चंदन चौहान आणि नगीना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ओम कुमार यांच्या प्रचार सभांना संबोधित केले.
योगी म्हणाले, समाजवादी पक्ष आणि बसपा सरकारच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कधीही वेळेवर पैसे दिले गेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून व्याजावर पैसे घ्यावे लागत होते. परंतु आज राज्यातील 120 साखर कारखान्यांपैकी 105 साखर कारखान्यांनी ऊस नेल्यापासून एका आठवड्याच्या आत पैसे दिले आहेत. उर्वरित 15 साखर कारखानदारांना लवकरात लवकर पेमेंट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर त्यांनी वेळेवर उसाचे पैसे न दिल्यास त्यांच्या साखर कारखान्याचा लिलाव करून अन्नदाता शेतकऱ्यांना साखर कारखान्याचे मालक बनवू, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारने उसाचा भाव केवळ ३६० रुपये प्रती क्विंटल केला आहे, जो यूपीच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत अपुरा आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारवर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा दर महागाईच्या मानाने कमीच आहे आणि पंजाबच्या ३८६ रुपये प्रती क्विंटल आणि हरियाणाच्या ३९१ रुपये प्रती क्विंटलपेक्षा खूप कमी आहे.
सहारनपूरमध्ये पंतप्रधानांच्या रॅलीपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांना तीन प्रश्न विचारले आहेत, त्यापैकी एक सहारनपूरच्या लाकूड-कोरीव उद्योगावर होता. आज पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील सहारनपूरला भेट देतील, जिथे दुहेरी इंजिन सरकारला इंधनाच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे, असे रमेश यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
दरम्यान, यूपी नियोजन आयोगाचे माजी सदस्य सुधीर पंवार यांनी टिप्पणी केली आहे की, ‘यूपीमध्ये एसएपी, जे आधी इनपुट खर्चावर ठरवले जात होते, ते आता निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार ठरवले जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यास भाजप सरकार का टाळाटाळ करत आहे, हे पंतप्रधान सांगू शकतील का?, वारंवार कारवाईचे आश्वासन देऊनही उत्तर प्रदेश सरकार भटक्या गुरांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष देण्यास अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, पुरेशा पशू निवाऱ्या अभावी पशुपालक त्यांची जनावरे सोडून त्यांची काळजी घेणे टाळतात.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना म्हणाले की, पूर्वी जिथे शेतकऱ्यांची उसाची बिले पाच ते दहा वर्षांपर्यंत लांबली होती, आज ती आठवडाभरात दिली जात आहेत. भाजपच्या काळात नवीन साखर कारखान्यांचीही उभारणी करण्यात आली. त्याचा राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.