सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे विस्तारवाढीचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याचा २०२४-२५ चा गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी केले.
दौलतनगर, (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते जयराज देसाई, युवा नेते आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक सुनिल शिवराम पानस्कर व त्यांच्या सुविद्य पत्नी मंगल सुनिल पानस्कर यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली.
चेअरमन देसाई म्हणाले, राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी साखरेचा किमान विक्री दर हा ३८ रुपये करावा अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय सहकारी मंत्री अमित शहा यांना भेटून विनंती केलेली आहे. केंद्र शासनाकडून लवकरात लवकर निर्णय होणे अभिप्रेत आहे. तसा निर्णय झाल्यास येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसाला जादा दर देणे शक्य होणार आहे. यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दिपावली सणासाठी ११ टक्के बोनस जाहीर करत असल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे, माजी चेअरमन अशोकराव पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण, अॅड डी.पी. जाधव, अॅड, मिलिंद पाटील, सभापती बाळासो पाटील, संचालिका दिपाली पाटील, जयश्री कवर, जालंदर पाटील, सर्जेराव जाधव, प्रशांत पाटील, शशिकांत निकम, शंकरराव पाटील, बळीराम साळुंखे, लक्ष्मण बोर्गे, सुनील पवार, वाय. के. जाधव, हेमंत पवार, गोरख देसाई, प्रकाशराव जाधव, राजाराम मोहिते, कार्यकारी संचालक सुहास देसाई तसेच कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कामगार वर्ग हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.