कोल्हापूर : जिल्ह्यातील लाटवडे (ता. हातकणंगले) गावच्या उद्योजक शंकर पाटील यांनी ५० ते ५५ पेऱ्यांचा लांबलचक ऊस पिकवला आहे. पाटील हे कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली तर मुरमाड शेत जमिनीत ऊसाचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावात त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. शेतात पिकवलेल्या लांबलचक उसाची राज्यभर चर्चा सुरू आहे. पाटील यांना गुंठ्याला तीन टन उत्पादन घेण्यात यश आले आहे.
शंकर पाटील यांनी आधुनिक पद्धतीने ऊस शेती केली आहे. जुलैमध्ये ८६०३२ या जातीची बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची साडेचार फूट सरी सोडून लावण त्यांनी केली. मुरमाड शेत जमीन असल्याने चांगली उगवण झाली. त्यातून तब्बल ५० ते ५५ पेरे असणारा लांबलचक वजनदार ऊस सोळा महिन्यात तयार झाला. हा वजनदार ऊस तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागतेय. तीन एकरातील हा ऊस तब्बल ३६० टन उत्पादन देणारा ठरणार आहे. यासाठी त्यांना ऊस शेतीतज्ज्ञ सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शेतीचे योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन केले की भरघोस उत्पादन मिळते अन् आर्थिक फायद्याचा गोडवा ही चाखता येतो हे पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.