‘एंट्री’च्या नावाखाली ऊस तोडणीवेळी टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

कोल्हापूर : एकीकडे साखर कारखाने ऊस मिळविण्यासाठी धडपडत असताना शेतकरीही पाणी टंचाईमुळे ऊस लवकर गळीतास पाठवण्याची गडबड करत आहेत. मात्र, तोडणी टोळ्यांकडून शेतकऱ्यांकडून वारेमाप पैसे उकळले जात आहेत. टोळ्या टनामागे जादा दर आकारात आहेत. वाहनचालकांनीही ‘एंट्री’ रक्कम वाढवली आहे. शेतकऱ्यांची अशी लूट सुरू असताना साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी केलेल्या आंदोलनामुळे यंदा गळीत हंगाम उशीरा सुरू झाला. आतापर्यंत तालुका स्तरावर कारखान्यांनी एक ते तीन लाख टनापर्यंतचे गाऴप पूर्ण केले आहे. तालुकास्तरावर विविध दहा कारखान्यांत साधारण ४५० ते ५०० टोळ्या कार्यरत आहेत. सध्या शेतकऱ्यांची ऊस पाठवण्याची घाई आहे. त्यामुळे टोळ्यांचे फावत आहे. आठवड्यापूर्वी प्रती टन १०० रुपये घेतले जात होते. आता दुप्पट पैसे द्यावे लागत आहेत. वाहनचालकांची एंट्री १०० रुपयांनी वाढली आहे. आता ४०० रुपये आकारले जात आहे. तालुक्यात यंदा ६ लाख टनापर्यंत ऊस गळीताला जाईल, अशी शक्यता आहे. प्रती टन २०० रुपयांप्रमाणे टोळ्या १२ कोटी रुपयांपर्यंत पैसे उकळतील असा अंदाज आहे. कारखान्यांकडून कारवाई नसल्याने शेतकऱ्यांतून संताप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here