पुणे : चीनी मंडी
2005 पासून आतापर्यंत एस.एम.पी., एफ.आर.पी. च्या सूत्रात केलेला बदल ऊस उत्पादक शेतकर्यांच्या मूळावर उठला आहे. या बदलामुळे शेतकर्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याएवजी त्यात घटच झाल्याचे दिसते. 2005 – 06 च्या हंगामापासून तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी एफ.आर.पी. च्या सूत्रात महत्वाचे तीन शेतकर्यांदृष्टीने धोकादायक म्हणावेत असे बदल केले. पहिला बदल म्हणजे एफ.आर.पी. ( पूर्वी एस.एम.पी.) काढताना त्या कारखान्याचा गेल्या हंगामातील ‘अॅव्हरेज पीक रिकव्हरी’ पाया मानला जात असे . तो पाया बदलून केंद्र सरकारने गेल्या हंगामातील ‘अॅव्हरेज रिकव्हरी’ पाया मारण्याचे सूत्र स्विकारले
‘अॅव्हरेज पीक रिकव्हरी’ म्हणजे कारखान्यांच्या गळीत हंगामातील जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याच्या उतार्यांची सरासरी तर ‘अॅव्हरेज रिकव्हरी’ म्हणजे कारखान्याच्या संपूर्ण गळीत हंगामाची सरासरी रिकव्हरी. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात थंडीमुळे साखर उतारा चांगला असतो. त्यामुळे अॅव्हरेज रिकव्हरीपेक्षा अॅव्हरेज पीक रिकव्हरी ही एक ते दीड टक्का जास्त असते. हा पायाच बदलल्याने ऊस उत्यादकांची एफ.आर.पी. दीड टक्क्याने घटली. सध्याचा उसाचा दर विचारात घेतला तर 2017-18च्या हंगामात प्रतिटन 402 रुपयांनी ऊस दर घटला. कृषि मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार पुढील हंगामात तो दर प्रतिटन 412 रुपयांनी घटणार आहे.
पहिले दोन बदल असे…
केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 2005-06 मध्ये एफ.आर.पी. मध्ये केलेला दूसरा बदल म्हणजे, 1980 पासून एफ.आर.पी.( त्यावेळी एस.एम.पी./ मिनिमम सपोर्ट प्राईस ) साठी साडेआठ टक्के अॅव्हरेज पीक रिकव्हरी पायाभूत मानली जात होती. 2005-06 पासून हा पायाभूत उतारा 9 टक्के एवढा वाढवण्यात आला. पायाभूत उतारा 8.5 टक्के ऐवजी 9 टक्के केल्यामुळे पुन्हा अर्धा टक्का वाढ केली. म्हणजे आताच्या दराने प्रतिटन 138 रुपयांनी ऊस दर घटला. पुढील हंगामात प्रतिटन 145 रुपयांची घट होणार आहे. एफ.आर.पी. चा सूत्र बदल केल्यामुळे एकूण दोन टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजे सूत्र बदल केल्यामुळे 2017 – 18 च्या हंगामात प्रतिटन 536 रुपयांनी ऊस दर घटविला. तर आगामी 2018-19 च्या हंगामात प्रतिटन 550 रुपयांनी ऊस दर घटणार आहे.
तिसरा बदल…
2009-10 मध्ये एस.एम.पी. चे रूपांतर एफ.आर. पी.( फेअर अॅण्ड रेम्यूनरेटिव्ह प्राईस/ उचित व लाभकारी मूल्य) मध्ये केले आणि पूर्वीचेच बदललेले सूत्र एफ.आर.पी. साठी कायम ठेवण्यात आले. तिसरा मोठा बदल म्हणजे पायाभूत उतारा 9 टक्के ऐवजी 9.5 टक्के करण्यात आला . म्हणजे पुन्हा ऊस दर अर्धा टक्क्याने म्हणजे प्रतिटन 134 रुपयांनी घटविला. 2017 -18च्या संपलेल्या हंगामात पहिल्या 9.5 टक्के साखर उतार्याला प्रतिटन 2550 रुपये व पुढील एक टक्का वाढीस प्रतिटन 268 रुपये वाढ अशी एफ .आर.पी. आहे. सूत्र बदल नसता तर हा दर 8.5 टक्के उतार्याला लागू झाला असता आणि 13 टक्के अॅव्हरेज पीक रिकव्हरीला प्रतिटन 3,756 रुपये ग्रॉस एफ.आर.पी. असती. या रकमेतून प्रतिटन 450 ते 550 रुपये तोडणी वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन 3,200 ते 3300 रुपये दर मिळाला असता.
…तर प्रतिटन 3500 रूपये मिळाले असते
2018-19 च्या आगामी हंगामात पहिल्या 10 टक्के उतार्याला प्रतिटन 2,750 रुपये व पुढील एक टक्का वाढीस प्रतिटन 275 रुपये वाढ अशी एफ.आर.पी. आहे. सूत्र बदल नसता तर हा दर 8.5 टक्के उतार्याला लागू झाला असता आणि 13.5 टक्के अॅव्हरेज पीक रिकव्हरीला प्रतिटन 4,125 ग्रॉस एफ.आर.पी. असती. तोडणी वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन 3,500 ते 3600 रूपये दर ( आता प्रतिटन 3075) मिळाला असता. त्यानंतर उसदरासाठी शेतकर्याला झगडावे लागले नसते.