अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील ५.२३ लाख हेक्टरमधील गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. तर पंजाब आणि हरियाणात गव्हाच्या पिकाचे झालेले नुकसान तपासले जात आहे. खराब हवामानामुळे झालेल्या नुकसानीमुळे तसेच कापणीतील आव्हानांमुळे शेतकरी चिंतीत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी गव्हाची पेरणी ३४० लाख हेक्टरमध्ये झाली होती. सरकारने २०२३-२४ मध्ये उच्चांकी ११.२२ कोटी टन गहू उत्पादनाचे अनुमान वर्तविले होते. जागतिक स्तरावर भू-राजकीय अनिश्चिततांमुळे महागाई आणि अन्न सुरक्षेच्या संकटाची स्थिती निर्माण झाली असताना भारतात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या दोन आठवड्यात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पाश्चिमात्य विक्षोभामुळे गारपीट, वादळ आणि जोरदार वाऱ्यामुळे अवकाळी पाऊस कोसळला. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहील अशी शक्यता आहे. युपीत एक लाखहून अधिक शेतकऱ्यांचे ३५ हजार हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना ५८ कोटी ५९ लाख २९ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. हरियाणात ७.३० लाख एकरमधील पिके खराब झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील ५ हजार गावांतील १.३० लाख शेतकऱ्यांनी वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे. पंजाबमध्ये १३ लाख हेक्टरमधील गहू, फळे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.