कोल्हापूर : केंद्र शासनाकडून सप्टेंबर २०२४ महिन्यासाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी साखरेचा २३.५ लाख मेट्रिक टन इतका कोटा जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षी सप्टेंबर २०२३ साठी २५ लाख मेट्रिक टन कोटा जाहीर करण्यात आला होता. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळेस १.५ लाख मेट्रिक टन कमी कोटा देण्यात आला आहे. यामुळे बाजारात साखरेचे दर तत्काळ प्रति क्विंटल १०० ते १५० रुपये इतके वाढलेले दिसून येत आहेत. सप्टेंबर २०२४ ची परिस्थिती पाहता यामध्ये अजून दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत साखर उद्योग अभ्यासक पी. जी. मेढे यांनी व्यक्त केले आहे.
पी. जी. मेढे यांच्या मते, १.५ लाख मेट्रिक टनानी कोटा कमी जाहीर झाल्याबरेाबर मार्केटमध्ये थांबलेल्या मागणीमध्ये वाढ होऊन दर प्रति क्विंटल ३५६० वरून ३६५० झाले आहेत. याशिवाय अजून वाढ होवून दर ३७०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, सप्टेंबर २०२४ च्या कोट्यात वाढ होण्याऐवजी कमी झाला आहे. १ सप्टेंबर २०२४ पासून रेल्वेने मालवाहतुकीत सूट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आसाम आणि पश्चिम बंगाल मार्गावर मोठ्या प्रमाणात साखरेची मागणी वाढणार आहे. आगामी गणेशोत्सवामुळे मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मेढे यांनी म्हटले आहे कि, दुर्गापूजा मुख्यतः 2 आणि 3 ऑक्टोबरमध्ये सुरू होत असल्यामुळे सप्टेंबरमध्ये कोलकाता लाईनमधून मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. बहुतांश भागात साखर शिल्लक नाही. त्यामुळे मागणीमध्ये एकदम वाढ होऊन दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. रेल्वेने जाहिर केलेली भाड्यातील सवलत 30 सप्टेंबर रोजी बंद हेाणार असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी परराज्यातील मागणीत वाढ होणार आहे. ऑगस्टच्या शिल्लक कोट्यास मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्याचाही परिणाम किंमत वाढीवर होऊ शकतो, असेही मेढे यांनी ‘चीनीमंडी’ शी बोलताना सांगितले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.