नवी दिल्ली : हंगाम २०२३ (ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३) मध्ये निर्यातीमधील घसरणीसह ऊसाच्या योग्य आणि लाभदायी दरात तीन टक्के वाढीमुळे यावर्षी साखर कारखान्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, असे क्रिसिल रेटिंग्सने (Crisil Ratings) आपल्या अहवालात म्हटले आहे. साखर निर्यात गेल्या हंगामातील ११.२ मिलियन टनाच्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावरून २०२३ च्या हंगामामध्ये घटून ८-८.५ मिलियन टन होईल अशी शक्यता आहे. तर उत्पादन ३९.५-४०.० मिलियन टनावर स्थिर राहील अशी अपेक्षा आहे. अहवालात म्हटले आहे की, इथेनॉल मिश्रणासाठी साखरेचा अधिक वापर, गाळप हंगाम वगळता इतर काळात देशांतर्गत खपासाठी साखरेचा पुरेसा साठा शिल्लक ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांमुळे अशी स्थिती निर्माण होत आहे.
क्रिसिल रेटिंगचे वरिष्ठ संचालक अनुज सेठी यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात संपलेल्या हंगाम २०२२ च्या अखेरीस साखरेचा कॅरी ओव्हर स्टॉक पाच वर्षाच्या निच्चांकी स्तरावर आला होता.