सोलापूर : नेमतवाडी (ता. पंढरपूर) येथील ऊस वाहतूकदार ज्ञानेश्वर माने हे गेल्या सात वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांसाठी आगळा उपक्रम राबवित आहेत. त्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून ऊस तोडणीसाठी राबणाऱ्या महिला व पुरूष कामगारांना कपड्याचा आहेर, स्नेहभोजन देण्यात आले. गळीत हंगामाची सांगता होत असताना ऊस वाहतुकदाराने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाडा, धुळे, नंदुरबार या गुजरात सीमेवरील भागातून मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजातील ऊस तोडणी कामगार पश्चिम महाराष्ट्रात येतात. दिवाळीदरम्यान आलेले कामगार होळी सणावेळी गावी परतण्याच्या तयारीत असतात. कामगारांनी ऊस वाहतूकदाराकडून उचल घेतलेली असते. ऊस तोडणीसाठी आल्यानंतर फड मालकांकडून पैसेही घेतले जातात. यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. नेमतवाडी (ता. पंढरपूर) येथील ज्ञानेश्वर माने गेल्या सात वर्षांपासून कामगारांन कपडे आहेर देतात. कामगारांचा पाच महिन्यांचा हिशोब करून शिल्लक रक्कमही दिल्याचे माने यांनी सांगितले.