कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखाना प्रशासन विरोधी गटाच्या शेतकरी, सभासदांचा ऊस गाळपासाठी नेण्यास टाळाटाळ आणि ऊस नोंदी करत नसल्याचा आरोप करत कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना कसबा बावडा येथे मुख्य रस्त्यावर मोटार अडवून शेतकऱ्यांनी बेदम चोप दिला. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत शाहपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेनंतर अर्ध्या तासाने शाहूपुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याबाबत माहिती घेतली, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू होते.
उसतोडीत भेदभाव केल्याची शेतकऱ्यांची भावना…
‘राजाराम’चा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र, ऊसतोडीची तारीख ओलांडूनही केवळ विरोधक म्हणून आपला ऊस नेला जात नाही, अशी भावना अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांत होती. याबाबत विरोधी गटाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला दोनवेळा जाब विचारला होता. यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. केवळ यंत्रणा अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत अन्याय केला जात असल्याचा आरोप विरोधी गटाच्या शेतकऱ्यांनी केला.
सकाळी प्रादेशिक सहसंचालकाना निवेदन, सायंकाळी कार्यकारी संचालकांना मारहाण…
मंगळवारी सकाळी काही उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढून प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात जाऊन कारखाना प्रशासनाकडून उसतोडीमध्ये अन्याय होत असल्याबाबत निवेदन देऊन न्याय मिळण्यासाठी विनंती केली होती. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनीही या निवेदनाची दखल घेत राजाराम कारखाना प्रशासनाला पत्राद्वारे कळवले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गजबजलेल्या कसबा बावडा मुख्य मार्गावर कारखान्याचे कार्यकारी संचालक कामकाज आटोपून जात असताना पाटील गल्लीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांची मोटार अडवली. कार्यकारी संचालक चिटणीस यांना काही कळण्याच्या आतच मोटारीतून बाहेर ओढून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. चिटणीस यांच्या अंगावरील कपडे झटापटीत फाटले. यावेळी मोटारीवरही लाथा मारण्यात आल्या. काही शेतकऱ्यांनी मोटारीचा दरवाजा तोडला. अखेर काहींनी मध्यस्थी करून कार्यकारी संचालक चिटणीस यांना पुन्हा गाडीत बसवले आणि त्यांची मोटार मार्गस्थ झाली.
चिटणीस यांना मारहाणीचा हुपरी परिसरातून निषेध….
राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना झालेल्या मारहाणीचा हुपरी परिसरात निषेध केला जात आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा शंकर गोपाळ चिटणीस यांचे प्रकाश हे नातू आहेत. अशाप्रकारे एका अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने सोशल मीडियावर तीव्र निषेध व्यक्त होत आहे. राजकारण काहीही असो, सर्वसमावेशक अधिकाऱ्यांना मारहाण होणे निषेधार्ह आहे. चिटणीस यांचे सर्वच स्तरातील नागरिकांशी सलोख्याचे संबंध आहेत. अशा व्यक्तीला राजकीय वादातून मारहाण झाल्याने हुपरी परिसरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी एक शिष्टमंडळ जिल्हा पोलिसप्रमुखांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले.
घटना पूर्वनियोजित; दहशत माजविण्याचा प्रयत्न : अमल महाडिक
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या एम.डीं.ना झालेली मारहाण ही पूर्वनियोजित होती. यापूर्वी त्यांना धमकी देण्यात आली होती. निवडणुकीतील पराभव पचवण्याची ताकद विरोधकांमध्ये नसल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून येते. घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. आपण कार्यकर्त्यांना शांत राहण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु विरोधकांना योग्यवेळी जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी सांगितले. झालेल्या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना दिलेली आहे. पोलिस प्रशासनावर आपला विश्वास आहे. त्यामुळे आपल्याला नक्की न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कटामागे आमदार सतेज पाटीलच : खा. धनंजय महाडिक
राजाराम कारखान्याच्या एमडींना मारहाण करताना जो संदीप नेजदार व्हिडीओमध्ये दिसत आहे, त्यांचा स्वतःचा २५० टन ऊस राजाराम कारखान्याला गेला आहे. त्यांनी येऊन तिथे मारहाण करणे म्हणजे हा सारा पूर्वनियोजितच कट असून याच्या मागे स्वतः आ. सतेज पाटील आहेत, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत आ. पाटील गटाचा दारुण पराभव झाल्याने सध्या ते वैफल्यग्रस्त आहेत. सत्ता नसली की ते विचित्र वागतात, असा टोलाही महाडिक यांनी लगावला. ऊस वेळेत गेला नाही म्हणून एमडीला मारहाण हा महाराष्ट्रातल्या इतिहासातील काळा दिवस आहे. त्यामुळे मी राज्यातील सर्व साखर कारखानदार, सर्व संचालक, अधिकाऱ्यांना, नॅशनल फेडरेशन शुगर, त्याचबरोबर साखर संघालाही आवाहन करतो, अशा गुंडांना चाप बसला पाहिज, त्यासाठी योग्य ती पावले उचलावीत.
…तर डी. वाय. पाटील कारखान्यावर मोर्चा काढू
मोर्चाला उपस्थित २० ते २५ सभासदांपैकीही बऱ्याच लोकांचा ऊस कारखान्याने नेला असून खात्यावर पैसेही जमा झाले आहेत. केवळ कारखान्याच्या बदनामीच्या हेतूने कोणी प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रयत्न करत असेल, तर जशास तसे उत्तर देऊ. वेळप्रसंगी जिथे खासगीकरण झाले त्या डी. वाय. पाटील कारखान्यावर मोर्चा काढू, असा इशारा चेअरमन महाडिक यांनी दिला.
कार्यकारी संचालकांनी उद्धट उत्तर दिल्याने उद्रेक : सतेज पाटील गटाचा दावा
राजाराम साखर कारखान्यात विरोधी गटाच्या सभासदांच्या उसाची तोडणी लवकर होत नसल्याने सभासदांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा दावा आमदार सतेज पाटील गटाच्या वतीने करण्यात आला आहे. घटनेनंतर शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. आ. सतेज पाटील गटाच्या वतीने मोहन सालपे यांनी ही बाजू मांडली. मोहन सालपे म्हणाले, डॉ. संदीप नेजदार यांच्या उसाची लागवड ही २ जून २०२२ ची आहे. १८ महिने होऊन गेले. उस वाळत चालला आहे, तरीदेखील ऊस तोडणी नसल्याने डॉ. संदीप नेजदार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यकारी संचालकांची गाडी अडवून त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत असतानाच कार्यकारी संचालकांच्या चालकाने गाडी दाबण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. त्यातूनच हा प्रकार घडला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पोलिस मुख्यालयासमोर तणाव….
कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना मारहाण झाल्यानंतर महाडिक गटाचे कार्यकर्ते पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेण्यासाठी गेले. कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह अन्य काही निवडक कार्यकर्ते गेले होते. त्याचवेळी आ. सतेज पाटील गटाचे काही कार्यकर्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात, तर काही कार्यकर्ते कार्यालयाबाहेर जमले होते. दोन्ही गटांत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी जादा बंदोबस्त मागवला. शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी तेथे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.