मध्यप्रदेश : प्रमुख व्यापार केंद्र इंदूरमध्ये साखरेच्या मागणीत १५ टक्क्यांची वाढ

इंदूर : ऐन उन्हाळ्याच्या कालावधीत आइस्क्रीम आणि उन्हाळी शीतपेयांच्या वाढत्या वापरामुळे मध्य प्रदेशातील प्रमुख व्यापार केंद्र असलेल्या इंदूरमध्ये साखरेच्या मागणीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कडक उष्मा आणि शीतपेये, उन्हाळी पेये यांचा जास्त वापर होत असल्यामुळे उन्हाळ्यात साखरेच्या मागणीत नेहमीपेक्षा वाढ झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

याबाबत ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सियागंज होलसेल किराणा व्यापारी असोसिएशननुसार, इंदूरमध्ये साखरेचा दररोजचा वापर सुमारे १००० क्विंटल असल्याचा अंदाज वर्तवला आहे. किरकोळ विक्रेते आणि नजीकच्या बाजारपेठेतील मागणी वाढल्याने महाराष्ट्रातून इंदौरला होणाऱ्या साखरेच्या दैनंदिन आवकेतही वाढ झाली आहे. सियागंज घाऊक किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश खंडेलवाल यांनी सांगितले की, उन्हाळ्यात साखरेची मागणी वाढते. मात्र यावेळी प्रतिकूल हवामानामुळे त्यात १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. घरगुती, रेस्टॉरंट आणि औद्योगिक वापरामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

सियागंज हे इंदूरमधील सर्वात जुन्या किराणा बाजारांपैकी एक आहे, ज्यामध्ये सुमारे ५०० दुकाने आहेत. तर मल्हारगंज, मालवा मिल आणि मरोठिया मार्केट हे इंदूरमधील इतर किराणा घाऊक बाजार आहेत. सियागंजमधील साखर इंदूर आणि आसपासच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये नेली जाते. मार्च ते जून या कालावधीत साखरेला सर्वाधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साधारणपणे दर उन्हाळ्यात साखरेची मागणी ८-१० टक्क्यांनी वाढते. परंतु वाढणारे तापमान आणि निवडणूक रॅलींमुळे साखरेचा वापर सामान्यपेक्षा अधिक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

इंदूरच्या परदेशीपुरा मार्केटमधील किराणा व्यापारी राहुल अग्रवाल म्हणाले की, उन्हाळ्यात साखरेला सर्वाधिक मागणी असते. मात्र यावेळी खप जास्तच आहे. यावर्षी विवाह सोहळ्यांची संख्या कमी असल्याने आम्हाला सामान्य वाढ अपेक्षित होती. परंतु उच्च तापमान आणि निवडणुकांमुळे साखरेच्या विक्रीला चालना मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here