रीवा : आयटीआयमधून शिक्षण घेतलेल्या येथील अजय पटेल या शेतकऱ्याने कांदा आणि ऊस शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. इतर शेतकऱ्यांसाठी ही यशोगाथा राज्याच्या कृषी विभागाने सर्वांसमोर आणली आहे. रीवा जिल्ह्यातील मंगवान तालुक्यांतर्गत मंगवा गावचे रहिवासी असलेले शेतकरी अजयकुमार यांनी ७०० क्विंटल कांदा उत्पादन घेतले आहे. अजय हे अलाहाबादला कांदे पाठवतात. या शेतीतून वर्षाला सुमारे पाच लाख रुपये कमवतात. कांदा लागवडीव्यतिरिक्त अजयने गेल्या वर्षभरापासून याच जमिनीवर उसाची लागवड सुरू केली आहे. त्यांनी किडनी बीनच्या शेतीतही हात आजमावला.
‘किसानतक’ वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, अजय यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. ते स्वतःच्या जमिनीवर कांद्याचे बियाणे तयार करतात. त्यांनी भाड्याच्या जमिनीवर अनेक पिके घेतली. त्यांना ऊस लागवडीबाबत फारसे तांत्रिक ज्ञान नसल्याने फारच कमी नफा मिळाला. आता नवीन तंत्रज्ञानाने ते ऊस लागवड करण्याची तयारी करत आहेत. अजय यांच्याकडे केवळ चार एकर जमीन होती. २०१३ पासून ते शेती करतात. आता त्यांनी भाड्याने जमीन घेतली आहे. सध्या अजयकडे २० एकर जमीन आहे. या जमिनीवर ते कांदा, भात, हरभरा, मसूर, गहू आणि इतर काही पिके घेतात. त्यांनी कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे.