बडवानी : मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्याच्या पानसेमल विभागातील मेंद्राणा येथील साखर कारखान्यात काल आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन राज्यांतील अग्निशमन दलाच्या बंबांनी जवळपास सहा तास प्रयत्न केले. आगीत कारखान्याचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.
युनिवार्तामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पानसेमल पोलीस ठाण्याचे प्रभारी लखन सिंह बघेल यांनी सांगितले की, सिंधवा खेतीया महामार्गावर मेद्राणा येथील दुर्गा खांडसरी कारखान्यात दुपारी अचानक आग लागली. याबाबत कारखान्याच्या व्यवस्थापकांनी माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. तीन राज्यांतील अग्निशामक दलाच्या बंबांनी आग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. जवळपास सहा तासांच्या मदतकार्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.