बुरहानपुर : जिल्ह्यातील निंबोला विभागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ऊस भुईसपाट झाला. ऊस उत्पादन क्षेत्रात किमान ४० शेतकऱ्यांच्या उसाचे या पावसाने नुकसान झाले. त्यामुळे उसाचे १० टक्के नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अन्य पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला असला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र त्याचा फटका बसला आहे.
निंबोला विभागात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उसासह केळी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे ऊस पडला असून पडलेल्या उसामुळे वजन घटण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. बुरहानपूर जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत ५६२.६ मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी या कालावधीपर्यंत ६१३.५ मिमी पाऊस झाला होता. नेपानगर विभागात गेल्यावर्षीपेक्षा जास्त, ६८२.९ मिमी पाऊस झाला आहे. तर खकनार भागात निम्मा म्हणजे ५१९.३ मिमी पाऊस यंदा झाला आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत ९७६.० मिमी पाऊस झाला होता.