महाबळेश्वर : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या महाबळेश्वरमध्ये तब्बल 12 वर्षानंतर विक्रमी म्हणजे 300 इंच पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरला महाराष्ट्रातील चेरापुंजी, असेही म्हटले जाते. या महाबळेश्वरने यावर्षी पावसाचे सर्वच विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्था केला असून, देशात सर्वाधिक पाऊस होणार्या मेघालयातील चेरापुंजीलादेखील मागे टाकले असून, देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला ओळखले जात आहे.
महाबळेश्वर शहर व परिसरात जून महिन्याच्या प्रारंभी ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. मात्र, जून महिन्याच्या उत्तरार्धात शहर व परिसरातला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार दि. 1 जून ते 4 सप्टेबर या कालावधीत मेघालयातील मौसिनराम येथे 6218.4 मिमी (245 इंच) तर चेरापुंजी येथे 6082.7 मिमी (240 इंच) पावसाची नोंद झाली आहे. दि. 1 जून ते 6 सप्टेबर अखेर पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे 7369 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरमध्ये 7569.1 मिमी अर्थात 299 इंच इतकी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यामध्ये पावासाने चांगलीच दडी मारल्याने ऐन पावसाळी हंगामात कधी नव्हे ते महाबळेश्वर वासीयांना सूर्यदर्शन झाले. त्यानंतर जुलैच्या उत्तरार्धात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करुन परिसराला अक्षरश: झोडपून काढले होते. जुलै महिन्याच्या 24 तारखेनंतर ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत या 15 दिवसात महाबळेश्वरमध्ये तब्बल 6468.4 मिमी (255 इंच) पावसाची नोेंद झाली. आजदेखील शहर व परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. रोज तीन चार इंच पावसाची नोंद होत असून या पवासाने महाबळेश्वरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या वर्षी 2018 मध्ये एकूण 246.89 इंच इतकी पावसाची नोंद झाली होती. महाबळेश्वर तालुक्याचा विचार करता तापोळा भागामध्ये 8667.00 मिमी तर लामज या गावी सर्वाधिक 9647.00 मिमी नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये 12 वर्षानंतर तब्बल 300 इंच पावसाची नोेंद अर्थात पावसाने आपले त्रिशतक पूर्ण केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.