शामली : थकीत ऊस बिले देण्याच्या मागणीसाठी शामली साखर कारखान्याबाबत सात जून रोजी प्रस्तावित महापंचायतीची शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. महापंचायत यशस्वी करण्यासाठी त्यांनी अनेक गावांचा दौरा केला. याशिवाय, शेतकरी नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवेदन दिले. थकीत बिले जर लवकरच मिळाली नाहीत, तर कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गठवाला खापचे श्याम सिंह, शेतकरी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष सवित मलिक, शेतकरी कामगार भारतीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलदीप पवार यांच्यासह शेतकरी नेते जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी उद्भव त्रिपाठी यांना निवेदन देताना शेतकरी नेत्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील गळीत हंगाम समाप्त झाला आहे. या हंगामातील १,१२७.३७ कोटी रुपयांपैकी फक्त २७४.६२ कोटी रुपयांची ऊस बिले मिळाली. तीन कारखान्यांकडे ८५२.७५ कोटी रुपये थकीत आहेत. शामली कारखान्याने या हंगामातील साखर विक्री करून गेल्या हंगामातील थकीत बिले दिली. थानाभवन आणि ऊन कारखान्यांनीही बिले थकवली आहेत. जर सर्व कारखान्यांकडून वेळेत पैसे मिळाले नाहीत तर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
शामली कारखान्यासमोर सात जून रोजी प्रस्तावित महापंचायत यशस्वी करण्याचे आवाहन करत शेतकरी नेते विनोद निर्वाल यांनी बनत, बधेव, मालैंडी, ताना, गोहरनी, भैंसवाल, पीरखेडा, लपराना, बुधपुरा, बलवा, खंद्रावली, अलीपूर, मन्ना माजरा, कंडेला आल्दी, जगनपूर या गावांचा दौरा केला. गावागावातील शेतकऱ्यांनी महापंचायतीला उपस्थित राहावे असे आवाहन केले.