पुणे : गाळप हंगाम २०२४-२०२५ साठी केंद्र सरकारने २७ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेद्वारे, किमान एफआरपी ऊस दर प्रसिद्ध केलेला आहे. या अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊस दर विचारात घेता, गाळप हंगाम २०२३-२०२४ साठी जाहीर केलेल्या एफआरपी ऊस दरात बदल झालेला आहे. केंद्र सरकारने याबाबत नवे निर्देश जारी केले आहेत. गाळप हंगाम २०२४-२०२५ व त्यापुढील हंगामांचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरुवातीचा किमान एफआरपी ऊस दर अदा करताना आधारभूत धरावयाचा साखर उतारा महसूल विभागनिहाय निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार, पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ टक्के साखर उतारा तर उर्वरीत छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या विभागांसाठी ९.५० टक्के साखर उतारा हा आधारभूत म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार, हंगाम २०२४-२०२५ करीता बेसिक १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी रास्त व किफायतशीर ऊसदर प्रती क्विंटल ३४० रुपये दिला जाणार आहे. या १०.२५ टक्के साखर उताऱ्यावरील प्रत्येक ०.१ टक्के उतारा वाढीसाठी प्रिमियम दर ३.३२ रुपये प्रती क्विंटल असेल. जर साखर उतारा १०.२५ टक्यांपेक्षा कमी, परंतु ९.५० टक्क्यापेक्षा जास्त असलेल्या प्रकरणांत प्रत्येक ०.१ टक्के उतारा घटीसाठी प्रती क्विंटल ३.३२ रुपये घट असेल. तथापि, जर साखर कारखान्याचा साखर उतारा ९.५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास रास्त व किफायतशीर ऊस दर हा ३१५.१० रुपये प्रती क्विंटल राहाणार आहे. वरीलप्रमाणे आधारभूत साखर उतारा विचारात घेऊन त्या-त्या महसूल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने एफआरपी धोरणात २७ फेब्रुवारीच्या अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या मुलभूत एफआरपी दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफआरपी ऊस दर निश्चित करून ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील कलम ३ नुसार अदा करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.