पुणे : केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाच्या धोरणात बदल केल्यानंतर राज्यात साखर उत्पादन वाढले आहे. यंदाच्या गळीत हंगामात आजअखेर ९८६ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. सरासरी १०.१४ टक्के उताऱ्यानुसार १०० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. आणखी दोन ते तीन लाख टन साखर उत्पादन वाढेल असा अंदाज आहे. हंगामात १०३ सहकारी आणि १०४ खासगी मिळून २०७ साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत ४३ कारखान्यांचे गाळप समाप्त झाले आहे.
अद्याप १६४ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. ऊस तोडणी टोळ्यांच्या उपलब्धतेनुसार शेवटच्या टप्प्यातील तोड सुरू आहे. त्यामुळे हंगाम १० एप्रिलपर्यंत चालण्याचा अंदाज आहे. साखर आयुक्तालयाच्या हंगामाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार साखर उत्पादन ८८ लाख टन होण्याची शक्यता होती. इथेनॉलकडे वळणारी १५ लाख टन साखर एकत्र केल्यास १०३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. मात्र इथेनॉल उत्पादनावरील निर्बंधामुळे साखर उत्पादन अपेक्षेनुसार वाढले आहे. राज्यात सध्या दैनिक अडीच ते लाख टन ऊस गाळप सुरू आहे.