पुणे : यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील २०७ साखर कारखान्यांनी जानेवारीअखेर ७२६.५३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ९४ कारखान्यांनी उसाची पूर्ण एफआरपी अदा केली आहे. तर राज्यातील सर्वच कारखान्यांनी ९१.४५ टक्के एफआरपी अदा केली आहे. चालू हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी मजुरांच्या कमतरतेमुळे हंगामच लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत साखरेचे उतरलेले दर व शासनाच्या बदलत्या धोरणाचा आर्थिक फटकाही कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे.
जानेवारीअखेर गाळप झालेल्या उसाची एफआरपी रक्कम १७ हजार ६३३ कोटी रुपये आहे. यापैकी १६ हजार १२६ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. एक हजार ५०७ कोटी रुपये अद्याप मिळायचे आहेत. राज्यातील ४९ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के एफआरपी दिली आहे. तर ३३ कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के एफआरपी अदा केली आहे. ३० कारखान्यांनी ० ते ५९ टक्के एफआरपी दिली आहे. दरम्यान, काही कारखान्यांतील कर्मचाऱ्यांचे दोन ते अकरा महिन्यांचे वेतनही थकले आहे, तर एफआरपीसह अन्य आर्थिक देणी भागवण्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते, व्याजही काही प्रमाणात थकले आहे.