महाराष्ट्र : राज्यातील १०५ साखर कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

कोल्हापूर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात सहभागी झालेल्या २०० साखर कारखान्यांपैकी १०५ कारखान्यांनी शंभर टक्के रक्कम दिली आहे. यंदा मार्चच्या पहिल्या पंधरवड्याअखेर ८४४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. याची तोडणी, वाहतूक खर्चासहीत एफआरपी २८,२३१ कोटी रुपये झाली. यापैकी २६,७९६ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अजूनही १,४३२ कोटी रुपयांची शेतकऱ्यांची थकबाकी कायम आहे. ९४ टक्के एफआरपीची रक्कम उत्पादकांना देण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. तर ९५ साखर कारखान्यांनी पूर्ण एफआरपी देण्यास असमर्थता दाखवली आहे.

‘अग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यंदा अनेक कारखान्यांना एफआरपी वेळेत देणे शक्य झाले नाही. गळीत हंगाम पूर्ण झाला तरीही राज्यातील तब्बल ५० टक्के कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली नसल्याचे चित्र आहे. जवळपास ५० कारखान्यांनी ‘एफआरपी’च्या ८० ते ९९ टक्के रक्कम दिली आहे. याचबरोबर ३१ साखर कारखान्यांनी ६० ते ८० टक्के रक्कम अदा केली आहे. १४ कारखान्यांनी केवळ ५९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिली आहे. एफआरपी देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने राज्यातील १५ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. यापैकी नऊ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील असून अहिल्यानगर व सातारामधील प्रत्येकी दोन आणि छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. यंदा उसाची टंचाई असल्याचे चित्र दिसले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here