मुंबई : राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र, ऊस दरासाठी कोल्हापूर, सांगली या साखर पट्ट्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे गाळप हंगाम कासवगतीने सुरु होता. नागपूर विभागातही आतापर्यंत गाळप हंगाम जोरात झालेला नाही. मात्र राज्यात जोरदार गाळप झाल्याचे चित्र आहे. २३ नोव्हेंबरअखेर ११६ लाख ९३ हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. सरासरी ७.६६ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ८९ लाख ५६ हजार क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले आहे. सांगली जिल्ह्यात ऊस दरावरून अद्याप साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एकमत झालेले नाही.
राज्यात सध्या ७९ सहकारी व ८२ खासगी साखर कारखाने आहेत. यामध्ये १६१ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जादा रक्कम मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांबाबत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचे उत्पादन होते. येथील आंदोलनामुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाला आहे. आता तोडगा निघाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रस्तावाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने हंगाम वेगावणार आहे.
गेल्यावर्षी, २०२२-२३ मध्ये २३ नोव्हेंबरअखेर १८३ कारखाने सुरू होते. त्यांनी १७५ लाख १६ हजार टन ऊस गाळप केले. सरासरी ८.४५ टक्के उताऱ्यानुसार १४८.०९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. या तुलनेत यंदा २३ नोव्हेंबरअखेर पुणे विभागात २,५२६ लाख ६७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.०५ टक्के उताऱ्यासह २१ लाख ४८ हजार साखर उत्पादन झाले आहे.