पुणे : यंदा राज्यातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. तर राज्यातील ८७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप सुरू आहे. यंदाचा ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाला आहे. त्यामुळे गळीत हंगामाला आता साडेचार महिने पूर्ण झाले आहेत. राज्यातील सर्व उसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत कारखाने सुरू ठेवले जाणार जातील असे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.
गळीत हंगामात एकूण कारखान्यांपैकी १०३ सहकारी आणि १०४ खासगी कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले होते. चार कारखाने गाळप सुरू करू शकले नाहीत. आता १२० कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप पूर्णपणे संपले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप संपलेल्या कारखान्यांमध्ये वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे साखर कारखाना, दौलत सहकारी साखर कारखाना (चंदगड), अप्पासाहेब नलावडे (गडहिंग्लज), उदयसिंहराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक (सर्व सहकारी) आणि अथनी शुगर इको केन एनर्जी, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी (सर्व खासगी) आदी कारखान्यांचा समावेश आहे.