पुणे : महाराष्ट्रातील 2024-25 चा ऊस गाळप हंगाम वेग घेत असून 143 साखर कारखान्यांनी क्रशिंग सुरू केले आहे. साखर आयुक्तालय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबरपर्यंत राज्यात एकूण 105.47 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून 80.56 लाख क्विंटल (8.05 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी रिकव्हरी दर ७.६४ टक्के आहे.
पुणे विभागात 26.56 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 20.47 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या विभागाचा सरासरी रिकव्हरी दर 7.71% आहे. या विभागात एकूण 26 कारखाने कार्यरत आहेत, त्यात 15 सहकारी आणि 11 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागात 20 सहकारी आणि 10 खाजगी कारखान्यांनी 21.65 लाख टन उसाचे गाळप केले असून, 19.19 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागाचा राज्यात सर्वाधिक 8.86% रिकव्हरी दर आहे.
ऊस गाळपामध्ये सोलापूरचा तिसरा क्रमांक लागतो. येथे 10 सहकारी आणि 16 खाजगी असे एकूण 26 कारखाने सुरु आहेत. या विभागात आतापर्यंत 18.59 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 12.73 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर विभागाचा रिकव्हरी दर 6.85% आहे. गाळपात अहमदनगर विभाग चौथ्या क्रमांकावर आहे, 12 सहकारी आणि 8 खाजगी कारखान्यांनी 15.22 लाख टन उसाचे गाळप केले असून, 10.76 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा रिकव्हरी रेट 7.07% इतका आहे, जो सोलापूरच्या तुलनेत जास्त आहे.
गाळपाच्या बाबतीत नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर विभाग अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. नांदेडमध्ये, 8 सहकारी आणि 17 खाजगी अशा एकूण 25 कारखान्यांनी 13.07 लाख टन उसाचे गाळप केले असून, 10.21 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. रिकव्हरी दर 7.81% आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 सहकारी आणि 7 खाजगी अशा एकूण 15 कारखान्यांनी 9.26 लाख टन उसाचे गाळप करून 6.37 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नागपूर विभागात सध्या एकही साखर कारखाना सुरु नाही.