पुणे : साखर आयुक्तालयाकडून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या कार्यकारी संचालक पदासाठीच्या (एमडी) पॅनेलच्या मुलाखती तीन टप्प्यांत होणार आहेत. वैकुंठ मेहता सहकारी व्यवस्थापन संस्थेने (वैमनिकॉम) संबंधित पात्र उमेदवारांची यादी घोषित केली असून, त्यांच्या मुख्यालयात १८ जुलै रोजी पहिल्या टप्प्यातील मुलाखती होणार आहेत.
कार्यकारी संचालक पदासाठीच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या ७४ आहे. त्यामधून सुमारे ५० कार्यकारी संचालकांची निवड केली जाणार आहे. १८ जुलै रोजी २४ उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. १९ जुलै रोजी २४ उमेदवारांच्या मुलाखती निश्चित करण्यात आल्या आहेत. २२ जुलै रोजी २६ मुलाखती होतील. सहकारी साखर कारखान्यांच्या एमडीची वयोमर्यादा संपल्यानंतर पॅनेलमधील उमेदवारांमधून त्यांची निवड करावयाची आहे.
साखर आयुक्तालयाने भविष्याचा दृष्टिकोन विचारात घेऊन नवीन पॅनेल करण्यासाठी १८ एप्रिल २०२२ रोजी प्रक्रिया सुरू केली होती. या परीक्षांसाठी वैकुंठभाई मेहता डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे या संस्थेवर जबाबदारी सोपविण्यात आली. पहिल्या चाळणी परीक्षा ५ एप्रिल २०२३ रोजी पार पडल्या. त्यामध्ये २३९ विद्यार्थी पात्र करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा ही ४ मे २०२३ रोजी झाली तर आता तिसऱ्या टप्प्यात पात्र उमेदवारांच्या तोंडी मुलाखती तीन दिवसांत होत आहेत. राज्यात यापूर्वी २००५ साली ६६ उमेदवारांचे एमडी पॅनेलवर निवड करण्यात आली होती, तर २०१५ साली १०० उमेदवारांची निवड पॅनेलमध्ये करण्यात आली. त्यानंतर आता ९ वर्षांनी हे पॅनल निवडीची प्रक्रिया पूर्णत्वास येत आहे.