कोल्हापूर : यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने उसाच्या लागवडी घटल्या आहेत. आता गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरीही लागवडी संथ गतीने होत असल्याचे दिसते. पाण्याअभावी लागवडी घटल्यास पुढील वर्षी ऊस टंचाईची शक्यता आहे. यंदा हंगाम लांबला आहे. मात्र पुढील वर्षी उलट स्थिती असेल. पुढील काही महिन्यांत पाणी कमी पडण्याची शक्यता असल्याने ऊस लागवडी कमी प्रमाणात होत असल्याचे साखर आयुक्तालयासह साखर कारखान्यांकडूनही सांगण्यात आले.
सद्यस्थितीत राज्यातील अनेक धरणांमध्येही मोजकाच पाणीसाठा आहे. उन्हाचा तडाखा मोठा आहे. एप्रिल व मे महिन्यात उपसाबंदीची शक्यता आहे. विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याची पातळी घटली आहे. पाणी मिळणार नाही या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी लागवडीचा बेत पुढे ढकलला आहे. एप्रिल, मे मध्ये पाणी कमी पडणार हे गृहीत धरुन शेतकऱ्यांनी ऊस लागवड थांबविली. यामुळे रोपवाटिकांतून सध्या रोपांची मागणी थंडावली आहे. जोपर्यंत जून, जुलैमध्ये पुरेसा पाऊस होणार नाही तोपर्यंत अपेक्षित लागवडी होण्याची शक्यता कमी आहे.