पुणे : राज्याचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने केव्हाच बंद झाले आहेत. काही बोटांवर मोजण्याइतके साखर कारखाने सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. अशा एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाईला सुरुवात केली आहे. राज्यातील अशा ३५ साखर कारखान्यांची साखर आयुक्तांसमोर सुनावणी झाली आहे.
तत्कालीन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी तब्बल ९५ साखर कारखान्यांची एफआरपी थकविल्याने मागील महिन्यात सुनावणी घेतली होती. त्यानंतर बऱ्याच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत. तरीही शेतकऱ्यांचे एकूण एफआरपीपैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम थकविणाऱ्या कारखान्यांची सुनावणी झाली आहे. साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे ६० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी थकबाकी असलेल्या राज्यातील ३५ साखर कारखान्यांची सुनावणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांकडे ५३४ कोटी, तर धाराशिव जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे ९६ कोटी ५० लाख असे १७ साखर कारखान्यांनी ६३० कोटी ३९ लाख रुपये एफआरपीचे थकविले आहेत. अशा कारखान्यांवर पुढील कारवाई होईल, असे साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी सांगितले.