कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी मात्र एफआरपी देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. राज्यातील १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. त्यामध्ये कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांचा समावेश आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक १९ कारखाने असून उर्वरीत १७ कारखाने सांगली जिल्ह्यातील आहेत. राज्यात कोल्हापूर विभाग हा साखरेच्या उत्पादनात आघाडीवर आहे. यंदा या विभागात प्रत्येक कारखान्याची एफआरपी ३१०० रुपयांच्या पुढे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक कारखान्याच्या साखर उत्पादनात घट असली तरी या कारखान्यांनी एफआरपी वेळेत दिली आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कोल्हापूर पाठोपाठ नांदेड विभाग एफआरपी देण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागातील २९ पैकी १६ कारखान्यांनी एफआरपी दिली आहे. राज्यात सर्वाधिक कारखाने असलेल्या सोलापूर विभागातील ४५ पैकी केवळ १४ कारखान्यांनीच एफआरपी दिली आहे. यात सोलापुरातील दहा तर धाराशिव मधील ४ कारखान्यांचा समावेश आहे. पुणे विभागामध्ये ३१ पैकी पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील १० कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली. अहिल्यानगर विभागातील २६ पैकी ९ कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली. छत्रपती संभाजीनगरमधील २२ पैकी ८ कारखान्यांनी एफआरपी दिली. नागपूरमध्ये एकाही कारखान्याने एफआरपीची रक्कम दिली नसल्याचे चित्र आहे. काही जिल्ह्यांत साखर उतारा घटल्याने बहुतांश कारखान्यांना पूर्ण एफआरपी देणे जमले नाही.