सोलापूर : नव्या गळीत हंगामाची चाहूल लागली तरी अद्याप राज्यातील ३७ साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील एफआरपीचे पैसे थकवले आहेत. सुमारे २५० कोटी रुपयांची एफआरपी थकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण १४ जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली आहेत.
‘पुढारी’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ६५ कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. त्याखालोखाल हिंगोली जिल्ह्यात ३२.११ कोटी रुपये, परभणी जिल्ह्यात २६.५९ कोटी रुपये, जालना जिल्ह्यात २२.३० कोटी रुपये, पुणे जिल्ह्यात १९.९४ कोटी, नाशिक जिल्ह्यात १८.३१ कोटी, सातारा जिल्ह्यात १७.४९ कोटी रुपये, अहमदनगर जिल्ह्यात १५.१५ कोटी रुपये आणि धाराशिव जिल्ह्यात ११.७० कोटी रुपये थकीत आहेत. सांगली, नांदेड, बीड, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातही शेतकऱ्यांचे ६० लाख ते साडेनऊ कोटी रुपयांपर्यंत विविध एफआरपी थकीत आहे.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आठ कारखान्यांकडे पैसे थकले आहेत. इतर जिल्ह्यांतील २९ कारखान्यांनी एफआरपीचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत. दरम्यान, थकीत एफआरपी तातडीने द्यावी अशी सूचना साखर आयुक्त व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना दिल्या आहेत. मात्र, कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे. साखरेला चांगला दर असतानाही कारखानदार एफआरपी थकवून स्वतःचे हित साधत आहेत. थकीत एफआरपी मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस पाठवू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केले आहे.