औरंगाबाद : महाराष्ट्रात चालू हंगामात ऊस आणि साखर उत्पादनाचा विक्रम मोडला आहे. राज्याने आपला प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेशला उत्पादनात मागे टाकले आहे. देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले आहे. २०२१-२२ मध्ये चालू गळीत हंगामात महाराष्ट्र सर्वाधिक ऊस गाळप करीत असून सर्वाधिक साखर उत्पादन करीत आहे. आतापर्यंत ११९४.७५ क्विंटल ऊस गाळप करून १२४.७५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यात ४० साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. राज्यात अद्याप ९० लाख टन ऊस गाळप अद्याप शिल्लक आहे.
उत्तर प्रदेशात आतापर्यंत ९१३ लाख टन ऊस गाळप करून ९२.३३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. हा सलग दुसरा हंगामा आहे, जेव्हा महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखर उत्पादित केली आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्राने ९९५.०५ लाख टन ऊस गाळप करून १००.५० लाख टन साखर उत्पादित केली होती. तर उत्तर प्रदेशने ९०१.४४ लाख टन ऊस गाळप करून ९३.७५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते.
महाराष्ट्र २०२०-२१ या हंगामातील ११.३ लाख हेक्टर ऊस क्षेत्राच्या तुलनेत यंदा या नकदी पिकाचे १२.३ लाख हेक्टर क्षेत्र अधिक आहे. प्रती हेक्टर उत्पादकताही वाढली आहे. सलग दोन वर्षे चांगल्या मान्सूनमुळे आणि धरणे भरल्याने उत्पादन वाढीस मदत झाली आहे. सध्या कडक उन्हाळा असला तरी शेतात उभ्या असलेल्या उसाचे फारसे नुकसान झालेले नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सांगली अथवा कोल्हापूर या साखरेचे कोठार मानल्या गेलेल्या विभागाऐवजी दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि सोलापूर ऊस उपलब्धतेत अग्रेसर आहे. आतापर्यंत १९८ पैकी फक्त ४० कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूरमधील २८ कारखान्यांचा समावेश आहे. औरंगाबाद विभागात फक्त एक कारखाना बंद झाला असून नांदेड विभागातील २७ पैकी एकाही कारखान्याने गाळप बंद केलेले नाही.