महाराष्ट्र : मागील हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत साखर उत्पादनात 6 लाख टनाची घट

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरवाढीवरून गेले दोन महिने सुरु असलेल्या आंदोलनाची गुरुवारी रात्री 7 वाजता सांगता झाली. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली आणि सातारा या राज्यातील महत्वाच्या ऊस उत्पादक जिल्ह्यात शुक्रवारपासून (24 नोव्हेंबर) गाळप हंगामाला गती आली आहे. असे असले तरी साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या 22 नोव्हेंबरअखेरील आकडेवारीनुसार, मागील हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत साखर उत्पादनात 6 लाख टनाची घट पाहायला मिळत आहे.

राज्यात 90 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता : अॅग्रीमंडी लाइव्ह

राज्यात गाळप परवान्यासाठी अर्ज केलेल्या 217 साखर कारखान्यापैकी 154 साखर कारखान्यांनी हंगाम सुरु केले आहे. त्यात शुक्रवारपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांची भर पडेल. ‘अॅग्रीमंडी लाइव्ह’च्या अंदाजानुसार, यंदा राज्यात 90 लाख टन इतके साखर उत्पादन होऊ शकते. पावसाच्या कमतरतेचा ऊस वाढीवर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होताना दिसत आहे.

राज्यात आतापर्यंत 105 लाख टन उसाचे गाळप …

राज्यात 22 नोव्हेंबर अखेर 154 साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामध्ये 76 सहकारी आणि 78 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. मागील वर्षी याच काळात तब्बल 183 कारखाने सुरु होते. त्यात 91 सहकारी आणि 92 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी 166 लाख टन उसाचे गाळप करून 14 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. यंदा 154 कारखान्यांनी 105 लाख टन उसाचे गाळप करून 8 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.

सोलापूरची गाळपामध्ये आघाडी, उताऱ्यात पिछाडी….

कोल्हापूर विभागात 22 साखर कारखाने (14 सहकारी आणि 8 खाजगी) सुरु असून त्यांनी 14.13 लाख टन उसाचे गाळप करून 11.65 लाख क़्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी उतारा 8.24 टक्के इतका आहे. पुणे विभागातही 22 साखर कारखाने (15 सहकारी आणि 7 खाजगी) सुरु असून त्यांनी 22.66 लाख टन उसाचे गाळप करून 8.16 च्या सरासरी उताऱ्याने 18.48 लाख क़्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सोलापूर विभागात राज्यात सर्वाधिक 38 साखर कारखाने (13 सहकारी आणि 25 खाजगी) सुरु आहेत. या साखर कारखान्यांनी 24.3 लाख टन उसाचे गाळप करून 17.74 लाख क़्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी उतारा मात्र 7.3 इतका कमी आहे.

औरंगाबाद विभागाचा उतारा राज्यात सर्वात कमी…

अहमदनगर विभागात 21 साखर कारखाने (12 सहकारी आणि 9 खाजगी) सुरु झाले आहेत. त्यांनी 15.53 लाख टन उसाचे गाळप करून 7.5 टक्के सरासरी उताऱ्याने 11.64 लाख क़्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. औरंगाबाद विभागात 22 साखर कारखाने (13 सहकारी आणि 9 खाजगी) सुरु असून 12.52 लाख टन उसाचे आतापर्यंत गाळप करण्यात आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे औरंगाबाद विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी म्हणजे 6.61 इतका असून साखर उत्पादन 8.27 लाख क़्विटल इतके झाले आहे.

नांदेड विभागात 15.12 लाख टन उसाचे गाळप…

नांदेड विभागात 27 साखर कारखाने (9 सहकारी आणि 18 खाजगी) सुरु झाले असून 15.12 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 7.62 इतका सरासरी उतारा पडला आहे. या विभागात 11.52 लाख क़्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अमरावती विभागात केवळ 2 खाजगी साखर कारखाने सुरु झाले असून त्यांनी 1.37 लाख टन उसाचे गाळप करून 1.13 लाख क़्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वात जास्त 8.25 टक्के उतारा अमरावती विभागाचा आहे. नागपूर विभागात एकही साखर कारखाना सुरु झालेला नाही.

गाळप हंगामावर अवकाळी पावसाचे ढग…

23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान कोकण आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. IMD पुणेचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या मतानुसार, पूर्वेकडील जोरदार लाटांमुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 23 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जर पश्चिम महाराष्ट्र पाऊस झाला तर गाळप हंगामात व्यत्यय येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here