पुणे : यंदाचा ऊस गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी शेतकऱ्यांना दिलेली नाही. काही कारखान्यांनी गेल्या एक ते दीड महिन्यांपासूनची एफआरपी रक्कम दिलेली नाही. राज्यातील २०६ साखर कारखान्यांपैकी केवळ ९२ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे.
फेब्रुवारी अखेर राज्यभरात ८२४.८० लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. तोडणी, वाहतूक खर्चासह या उसाची एफआरपी २५ हजार ५०६ कोटी रुपये होते. यातील ९६.६८ टक्के रक्कम म्हणजे २४ हजार ६६० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांचे ८४६ कोटी रुपये अद्याप कारखान्यांनी देणे बाकी आहे. तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता एफआरपीची ९१.९० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. ६४ कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. आणि ३१ साखर कारखान्यांनी ६० ते ८० टक्क्यांपर्यंत एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. राज्यातील १९ साखर कारखान्यांनी एकूण एफआरपीमधून केवळ ६० टक्क्यापर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. सद्यस्थितीत ११४ कारखान्यांकडे अजून शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम बाकी आहे.